MPSC उत्तीर्ण दर्शना पवार मृत्यू प्रकरणास धक्कादायक वळण, तो तरुण अद्यापही फरार..! | Darshana Pawar Death Case | Pune Crime|

 MPSC उत्तीर्ण दर्शना पवार मृत्यू प्रकरणास धक्कादायक वळण, तो तरुण अद्यापही फरार..!


Darshana Pawar death case 


पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी (MPSC) स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करून अधिकारी झालेली अहमदनगर जिल्ह्यातील तरुणी दर्शना पवार हिच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे, यामुळे या प्रकरणास वेगळेच वळण मिळाले, तरी तो तरुण अद्यापही फरार असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. ( Darshana Pawar Death Case)


दर्शना दत्ता पवार असे खून झालेल्या उच्चशिक्षित मुलीचे नाव असून तिच्या पुण्यातून बेपत्ता झाल्यापासून ते किल्ले राजगडच्या पायथ्याशी (Rajgad Fort ) सडलेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह यामध्ये जवळपास सहा ते आठ दिवसांचे अंतर आहे. 


दर्शना ही ९ जून रोजी सत्कारासाठी पुण्यात आली होती. १० जून सायंकाळी चार वाजेपर्यंत ती घरच्यांच्या संपर्कात होती. त्यानंतर दर्शनाने घरातील व्यक्तींचे फोन स्वीकारले नाहीत. दरम्यान दर्शनाचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी पुण्यात येऊन अकॅडमीत चौकशी केली असता तसेच पुण्यात आल्यानंतर ज्या मैत्रिणीकडे राहिली होती त्या मैत्रिणी कडे चौकशी केली असता ती राहुल दत्तात्रेय हंडोरे नामक युवकाच्या बरोबर सिंहगड व राजगड किल्ला फिरायला गेल्याचे कळले. दोघांचेही फोन बंद असल्याच्या कारणाने दर्शनाच्या वडिलांनी सिंहगड रस्ता पुणे येथील पोलीस स्टेशनमध्ये दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार दिनांक १५ जून रोजी दाखल केली .


दरम्यान मुलीचे वडील व नातेवाईक हे किल्ले राजगडच्या पायथ्याशी गुंजवणे येथे येऊन परस्पर चौकशी करून गेले. दरम्यान १८ जून रोजी दर्शनाचा मृतदेह किल्ले राजगड च्या पायथ्याशी सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने वेल्हे पोलिसांकडून दर्शनाच्या वडिलांची संपर्क साधून घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी सापडलेला मोबाईल, बूट ,गॉगल ,पर्स ,ओढणी,  या वस्तू दर्शनाच्या, व जॅकेट व बॅग राहुलच्या असल्याचे वडिलांनी ओळखल्यानंतर सदर मृतदेह हा दर्शनाचा असल्याचे सिद्ध झाले.


 दरम्यान तिच्याबरोबर आलेला मुलगा राहुल हा त्या दिवसापासून फरारी असल्याने संशयाची सुई त्याच्याकडे वळली, परंतु शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत नक्की कारण समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवाला नंतर डोक्यावर व अंगावरील जखमा नंतर दर्शनाचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अज्ञात व्यक्ती विरुद्ध वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या खुनाबाबत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विट करत सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु दर्शना बरोबर आलेला मुलगा हा अद्यापही फरार असल्याने मोठे आव्हान पोलिसांच्या पुढे ठाकले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तसेच अनेक साक्षीदारांच्या चौकशीनंतरही खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याचे दिसून येत आहे. तपासासाठी अनेक पथके शोध मोहीम करत असली तरी तो तरुण हाती लागल्याशिवाय खुनाचे कारण अद्याप समोर येणे  शक्य नसल्याचे दिसून येत आहे.

Comments